Dr. Uddhav Bhosale
एसजीजीएस आयकॉन या पुस्तकातील एक लेख...
शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्चपदी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले
एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर समोरच राजवाड्यासारखी शोभनीय अशी प्रशासकीय इमारत आहे. दुतर्फा उंच वृक्षांनी व फुलांच्या झाडांनी सजलेला रस्ता, एखाद्या राजवाड्यात प्रवेश केल्याची अनुभुती येते. प्रशासकीय इमारतीचे सौंदर्य रात्रीच्यावेळी दिव्यांच्या प्रकाशाने अधिकच आकर्षक व मनमोहक दिसते. या इमारतीसमोर अंतिम वर्षाचे विद्यार्थी आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत फोटो काढण्यात गुंग होती. अशा या चैतन्यमय वातावरणात मुले सुद्धा रंगीबेरंगी कपडे परिधान करून आपल्या भावी आयुष्याच्या योजना आखत होते. थोड्याच वेळात अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार होते. तेवढ्यात प्रमुख पाहुण्यांची गाडी आली आणि सूत्रसंचलन करणार्या प्राध्यापकाने जाहीर केले, 'प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले आहे, सर्वांनी सभागृहात आसनस्थ व्हावे. आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या महाविद्यालयाचे १९८९ बॅचचे इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. उद्धव भोसले आले आहेत. शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्चपद असलेले कुलगुरू या पदावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रुजू झाले आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की आमचा एक माजी विद्यार्थी एवढ्या मोठ्या पदावर विराजमान झाला आहे.' डॉ. भोसले यांचे मंचावर आगमन होताच सर्वांनी टाळ्यांच्या गजराने त्यांचे सहर्ष स्वागत केले आणि सभागृह निनादला.
त्यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी संदेश दिला, 'प्रथमत: मी सर्व अभियंत्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. १९८५ साली मी जेव्हा या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता त्यावेळेसचा परिसर आणि आजचा परिसर यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. संचालक डॉ. यशवंत जोशी यांनी थोड्याच वेळापूर्वी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. दोन शाखेपासून सुरुवात झालेल्या महाविद्यालयात आज १० पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी अभियांत्रिकीचे कार्यक्रम आहेत. एकूण ३५०० विद्यार्थी या परिसरात अध्ययन करत असतात. जवळपास शंभर करोड रुपयांच्या इमारती अतिशय सुव्यवस्थित राखलेल्या ५० एकर निसर्गरम्य परिसरात उभारलेल्या आहेत. अद्ययावत मुलांचे-मुलींचे वसतीगृह, जिमखाना, खेळाचे मैदान, एटीएम, दवाखाना, कॅन्टीन, सुसज्ज क्लासरुम, अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय अशा अनेक सुविधांनी सजलेले हे महाविद्यालय महाराष्ट्राच्या टॉप महाविद्यालयांपैकी एक. याच महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. येथून बाहेर पडल्यानंतर कुठलेही क्षेत्र असो, आपल्या आवडीनुसार निवडा. त्यात ध्येयनिश्चिती करा आणि प्रगतीच्या पथावर मार्गक्रमण करा, आयुष्यात शॉर्टकट घेण्याचा प्रयत्न करू नका, चढ-उतार आयुष्यात येणारचं, कोणाला पाच वर्ष तर कोणाला वीस वर्ष ध्येयप्राप्तीसाठी लागतील. घाबरू नका, मागे हटू नका, लढत रहा आणि ध्येयाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर सामाजिक बांधिलकी बाळगा. फक्त नोकरीसाठी शिक्षण न घेता, व्यवसायात या, समाजसेवा करा.' सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांच्या संदेशाला प्रचंड प्रतिसाद दिला.
उच्चस्थानी पोहोचलेल्या उद्धवची कहाणी सुद्धा ग्रामीण भागातील निरक्षर शेतकरी कुटुंबापासून सुरू होते. परिस्थिती जेमतेमच होती. उद्धवचे प्राथमिक शिक्षण कुमठा अहमदपूर व बारावीपर्यंत शिक्षण परभणीला झाले. शाळेत असताना वकील सरांनी वाचनाची आवड लावली. ते नेहमीच सांगायचे, तुम्ही दुकानातून आणलेल्या मालासोबत जो कागद आणला आहे, तो सुद्धा वाचून काढा, म्हणजेच तुमचे सामान्य ज्ञान वाढेल. त्याबरोबर शाळेत ते व्यायाम पण करून घ्यायचे, यामुळे बौद्धिक आणि शारीरिक जडणघडण शाळेत झाली होती. बारावीला गणित विषयाच्या गटात ९८% व इतर मिळून १०१% झाले आणि महाराष्ट्रात कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला असता, पण आई-वडिलांच्या इच्छेमुळे एसजीजीएसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी भाऊजी प्रा. प्रकाश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
१९८९ साली इंजिनिअरिंग झाल्यानंतर एनडीएमध्ये निवड झाली होती आणि देहरादूनला शारीरिक तपासणी होती. पण मातृप्रेमाने उध्दवला थांबविले. त्यानंतर घराकडे व शेतीकडे लक्ष देता येते म्हणून एमजीएम नांदेडला लेक्चरर म्हणून रुजू झाला. पण काहीतरी मोठे करण्याची धडपड आणि जिद्द होती, त्यामुळे एमपीएससीची तयारी केली, पण त्यात यश मिळाले नाही. श्री कमलकिशोर कदम यांनी बोलावून सांगितले की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करा, आम्ही सहकार्य करू, परत एमपीएससीचा दोन वेळेस प्रयत्न केला. त्यावेळेस मित्र संजय लाठकर, एकनाथ डवले, आशुतोष डुमरे हे आयपीएस व आएएस झाले. आपले मित्र जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी झाले, आपली निवड झाली नाही असे वारंवार विचार मनात येऊन, त्यामुळे उध्दवला नैराश्य आले होते. जेव्हा अंधार पडतो त्या वेळेला दिवा लावून आपण लगेचच प्रकाश करत असतो, त्याप्रमाणे जेव्हा आयुष्यात नैराश्य येते तेव्हा एखाद्या प्रेरणास्त्रोताजवळ जाऊन आपल्याला प्रेरणा घेता येते. त्याचवेळी कमलकिशोर कदम साहेबांनी बोलावून प्रोत्साहित केले आणि एमजीएम मुंबई येथे बदली केली. आपण स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकलो नाही पण शिक्षण क्षेत्रात उच्चपद गाठायचे असा उद्धवने ठाम निर्धार केला होता आणि हा निर्धार आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात आयआयटी मुंबईला पीएचडीसाठी निवड झाली. आयआयटी मुंबईचे तत्कालीन संचालक डॉ. सुभाषिष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचा पाया रचला गेला. एकदा ग्रंथालयात उद्धवला पुस्तक सापडत नव्हते तेव्हा सर आले होते. त्याने सरांना विचारले, 'पुस्तक सापडत नाही'. सर म्हणाले, 'मन लावून शोध घे.' एकाच वाक्याने संशोधनाचे गुपित सांगून टाकले आणि जेव्हा मन लावून पुस्तक शोधत होता, तेव्हा ज्ञानाचा खजिना सापडला. प्रबंध, संशोधन, पेपर, शिक्षणात तंत्रज्ञानाचा खूप फायदा झाला.
त्यानंतर आयआयटीतील संशोधन प्रकल्पावर काम केले. रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राचार्य पदावर दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे प्राचार्य पदावर २००७ साली नियुक्ती झाली आणि आयुष्यच बदलले. स्व. विलासराव देशमुख यांचे ते महाविद्यालय, महाराष्ट्रात एकमेव महाविद्यालय असावे की जिथे प्राचार्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. प्रदीर्घ प्रशासनाच्या १४ वर्षाचा अनुभव आला. प्राचार्य या नात्याने संस्थेच्या प्रगतीसाठी खंबीर निर्णय घेतले. मुंबई विद्यापीठात अनेक वेळेस समिती व प्राधिकरणावर काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे उद्धवचे विद्यापीठाच्या व्यवस्थापनाचे बीज येथेच रोवल्या गेले. काही कटू प्रसंग आले. एकदा काही विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत कॉपी केली होती, तेव्हा प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून विरोध झाला, दबाव आला, फोन आले. परंतु त्याने मनाशी निर्धार केला होता की दोषी विद्यार्थ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. संस्थेचा लीडर या नात्याने काही वेळेस कठोर भूमिका घ्यावी लागते आणि विद्यार्थ्यांचे वर्षभराचे परफॉर्मन्स रद्द केले. या पदावर कार्यरत असताना चार पाच वेळेस परदेशी दौरा करण्याची संधी मिळाली. एकदा डीएसटीच्या एक्सपर्ट टीम सोबत इंग्लंडला जाण्यासाठी उद्धवची निवड झाली. पंतप्रधानांचे माजी सल्लागार सॅम पेट्रोदा त्या समितीत होते. परदेशातील विद्यापीठीच्या प्रगतीचा अभ्यास करून आपल्या विद्यापीठात अंमलबजावणी कशी करता येईल, यासाठी तो अभ्यास दौरा होता. उध्दवचे प्रशासनासोबत संशोधनाचे पण काम सातत्याने चालू होते. आजपर्यंत नऊ संशोधकांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले, अनेक प्रबंध जागतिक दर्जाच्या जर्नल्समध्ये प्रकाशित झाली व जागतिक परिषदेत सुद्धा प्रबंध सादर केली.
या सगळ्या अनुभवाच्या आधारावरती उद्धव यांची २०१८ साली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली. अभियांत्रिकीतून कुलगुरू झालेले ते पहिलेच कुलगुरू असावेत. डॉ. उद्धव भोसले म्हणाले, 'नियुक्ती झाल्यानंतर सुरुवातीला विद्यापीठात उपलब्ध असलेल्या संसाधनांचा अभ्यास केला आणि कार्यक्षमता व उत्पादकता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी केली. नियमांच्या चौकटीत राहून प्रशासनाला शिस्त लावली. ५६० एकर परिसरात व्यापलेल्या विद्यापीठात 'स्वच्छ विद्यापीठ आणि हरित विद्यापीठ' या घोषवाक्याप्रमाणे कार्य चालू आहे. दहा करोड लिटर पाणी क्षमतेचा पाणीसाठा तयार केला आहे. विद्यार्थी, प्राध्यापक व वन विभाग यांच्या सहकार्याने २५००० झाडांचे वृक्षारोपण केले आहे. आज ९०% टक्के झाडे संगोपन व संवर्धन यामुळे मोठी होत आहेत. पर्यावरणासाठी दर गुरुवारी 'नो व्हेईकल डे' म्हणून पाळला जातो. २०२० मध्ये आयसीटीचा वापर करून व्यवस्थापनाची कामे व कार्यपद्धतीचे डिजिटायझेशन चालू आहे. संशोधन वाढीसाठी सगळे हायटेक मशीन एकत्रित करून कन्सल्टन्सी व संशोधन चालू आहे. आपले विद्यापीठ भारतातले एकमेव विद्यापीठ आहे की ज्याने करोनाच्या टेस्टिंगसाठी प्रयोगशाळा अल्पशा कालावधीत उभारली आहे आणि त्यास एमसीईआर व एनएबीएलची मान्यता मिळाली आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट हा विद्यापीठाच्या प्रगतीचा एक मापक आहे. त्यामूळे तो विभाग कार्यान्वित करून विद्यापीठात पूल्ड कॅम्पस ड्राईव्ह घडवून आणला आणि विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले आहे. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये अर्थशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र या सर्व विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये चांगलीच मागणी असते, त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयात प्रभारी प्राध्यापक नेमून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे आणि प्लेसमेंट करण्याचे प्रयत्न आहेत.
विद्यापीठाच्या कार्यपद्धती जुन्याच पद्धतीने चालू आहेत, ज्यात कागदांचा वापर जास्त असतो. आज करोनामुळे आपल्याला नवीन पर्याय शोधावे लागणार आहेत. पेपरलेस काम करण्याचे कार्य चालू आहे. उदाहरणार्थ पीएचडीला प्रवेश घेताना अर्ज भरणे, प्रवेशाची कागदपत्रे, प्रस्ताव दाखल करणे, प्रगती अहवाल, एक्सपर्टचे शेरे, संशोधन प्रबंध दाखल करणे हे सगळे ऑनलाइनसाठी काम चालू आहे. कार्यकौशल्य आधारीत शिक्षणाची नितांत आवश्यकता पुढील काळात पडणार आहे, त्यामुळे केंद्र शासनाची एखादे केंद्रीय कार्यकौशल्य विद्यापीठ आपल्या परिसरात सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आजकाल शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळाची नितांत आवश्यकता आहे. आज आपल्या विद्यापीठात खूप मोठा परिसर असल्यामुळे, आम्ही केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करून विद्यापीठ परिसरात स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था ज्या महाराष्ट्रात फारच कमी, त्यातल्या त्यात मराठवाड्यात एक ही केंद्र शासनाची संस्था नाही, या नियोजनांमुळे त्या संस्था आपल्याकडे येतील. जेणेकरून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. या भागातील विद्यार्थ्यांचा विकास असे दृष्टिकोन समोर ठेवून धोरणात्मक नियोजनांची अंमलबजावणी चालू आहे.'
'प्रशासनाचे कार्य चालू असताना प्रचंड दबाव असतो, पण पोहण्याचा छंद आहे, नियमित योगा व व्यायाम त्यामुळे स्वास्थ्य संतुलित राहते. दोन कन्यारत्न एकीने एमबीबीएस पूर्ण केले आणि दुसरी एसजीजीएसमध्ये शिकत आहे, त्यामुळे कौटुंबिक समाधान पण आहे. आई-वडिलांच्या अपार कष्टाने आज शेतकऱ्याचा मुलगा कुलगुरू पदापर्यंत पोहोचला, त्याचा मला अभिमान आहे आणि माझेही समाजाला काही देणं लागतं त्यामुळे या पदावर कार्यरत असताना सर्वतोपरी प्रयत्नशील राहील' असे डॉ. उद्धव भोसले सांगतात.
(एसजीजीएस आयकॉन या पुस्तकातील एक लेख. लेखक, डॉ रविंद्र जोशी, प्राध्यापक वस्त्रतंत्र विभाग, एसजीजीएस नांदेड)
